हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

प्रशिक आनंद यांच्या लेखणीतून…!काँग्रेस हे जळते घर आहे’ या अलंकारिक विधानाचा अर्थ..वाचा संपूर्ण लेख..!

spot_img

🔴 LIVE TV 🔴

काँग्रेस हे जळते घर आहे’ या अलंकारिक विधानाचा अर्थ हा तत्कालीन राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून ‘काँग्रेस पक्ष हा लवकरच संपुष्टात येणार आहे’ या अर्थाने बाबासाहेब जनतेला तेव्हा सूचित करत होते, हा होय.
********************************************भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसमध्ये (INC) बरेच समाजवादी विचारसरणीचे (सोशालिस्ट) लोकही सामील होते. काँग्रेसअंतर्गत कार्यरत राहून डाव्या विचारसरणी कडे झुकलेला जो गट होता तो आचार्य नरेंद्र देव यांच्या नेतृत्वाखाली ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ (CSP) या नावाने कार्यरत होता. जवाहरलाल नेहरू यांच्या बोलावण्यावरून जयप्रकाश नारायण हे 1929 साली काँग्रेसमध्ये (Indian National Congress) सामील झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने भाग घेतला. ब्रिटिश सरकार विरुद्ध काँग्रेसने पुकारलेल्या असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे 1932 साली नाशिक येथे त्यांना तुरुंगवास झाला.

तुरुंगवासातच त्यांचा संपर्क राम मनोहर लोहिया, अशोक मेहता, मिनू मसानी, अच्युत पटवर्धन, सी के नारायण स्वामी आणि इतरही कार्यकर्त्यांशी आला. ही तत्कालीन नेतेमंडळी समाजवादी होती आणि ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ (CSP) या नावाने काँग्रेस (INC) अंतर्गत कार्यरत होती. 1939 साली जयप्रकाश नारायण हे ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टीचे’ जनरल सेक्रेटरी होते. काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या ‘ऑगस्ट 1942’ च्या ‘चले जाओ’ च्या आंदोलनात जेव्हा ज्येष्ठ काँग्रेसी नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली तेव्हा चळवळीची धुरा जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अरुणा आसफ अली यांनी हाती घेतली होती. मात्र लवकरच ब्रिटिश सरकारने त्यांनाही अटक करून तुरुंगात टाकले.

पुढे ते मोठ्या शिताफिने योजना आखून तुरुंगातून बाहेर (Escaped) पडले. आणि भूमिगत होऊन ‘आझाद दस्ता’ (Freedom brigade) बनवून ब्रिटिश सरकार विरुद्ध कार्यरत राहिले. काही महिन्यांनी, सप्टेंबर 1943 ला पंजाबमधून ट्रेनमध्ये प्रवास करताना त्यांना इंग्रज सरकारने अटक केली. जानेवारी 1945 ला लाहोरच्या फोर्टहून आग्र्याच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. एप्रिल 1946 ला जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांची आग्र्याच्या तुरुंगातून सुटका झाली. पुढे 18-20 मे 1946 रोजी मुंबईत एक परिषद घेण्यात आली. या परिषदेत ‘चलेजाव’ च्या आंदोलनात सहभागी झालेल्या भारतभरातील नेतेमंडळींनी हजेरी लावली.

आणि समाजवादी विचारसरणीस पुढे ठेऊन पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन, अरुणा आसिफ अली यांच्यावर सोपवण्यात आली. दरम्यानच्या काळात 1946 ला जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांना काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्यत्व देऊ केले. त्यावर समाजवाद्यांनी तीन अटी ठेवल्या. मात्र त्या अटींना अमान्य केल्यामुळे जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांनी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्यत्व घेण्याचे नाकारले. पुढे दोन महिन्यानंतर नेहरूंनी केलेल्या विनंतीला अनुसरून जयप्रकाश नारायण यांनी सदस्यत्व स्वीकारले आणि आपल्या या बदललेल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणही दिले. नोव्हेंबर 1946 साली काँग्रेसचे नवीन अध्यक्ष जे बी कृपलानी यांच्या नेतृत्वात मीरत (Meerut) येथे परिषद भरली. त्यात समाजवाद्यांच्या प्रतिनिधीस काँग्रेसचे जनरल सेक्रेटरीपद देण्यात यावे अशी त्यांची मागणी होती. मात्र झाले उलटेच ! मृदुलाबेन आणि राम मनोहर लोहिया यांना काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीतून वगळण्यात आल्याने जयप्रकाश नारायण हे वर्किंग कमिटीतून, राजीनामा देऊन बाहेर पडले. दरम्यान भारताची स्वातंत्र्याकडे वेगाने वाटचाल सुरू झाली होती.

पुढे 28 फेब्रुवारी 1947 ला ‘काँग्रेस’ (INC) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीने’ (CSP) असे ठरवले की, यापुढे काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीने, आपल्या नावातील ‘काँग्रेस’ (Congress) हा शब्द वगळून फक्त ‘सोशालिस्ट पार्टी’ म्हणूनच कार्यरत राहायचे आणि बिगर-काँग्रेसीजणांसाठी तिच्या सदस्यत्वाचे दार उघडे करायचे. ही घटना भारतीय समाजवाद्यांच्या चळवळीसंदर्भात तसेच काँग्रेसच्या वाटचाली संबंधात वळणदायी ठरली. आता जयप्रकाश नारायण यांचे असे मत पक्के झाले होते की ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ (INC) ला बरखास्त करून सामाजिक-आर्थिक कार्यक्रमांच्या आधारावर नवा राजकीय पक्ष खरे तर उदयास आणला पाहिजे. आणि अशा प्रकारे ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टीने’ (CSP) स्वतःला ‘सोशालिस्ट पार्टी’ (SP) जाहीर करून आणि काँग्रेस सोबत फारकत घेणारे एक मोठेच पाऊल पुढे टाकले होते. सरदार पटेल यांनी समाजवाद्यांना आवाहन केले की वर्षभर तरी त्यांनी साथ सोडता कामा नये जेणेकरून पुढे काहीतरी योग्य करता येईल. दुसरीकडे त्यांनी समाजवाद्यांवर, कांग्रेसच्या कारभारात अडथळा आणण्याचा आणि काँग्रेसवर सत्ता संपादनाच्या अनुषंगाने त्यांचा भरोसा नसल्याचाही ठपका ठेवला. त्यामुळे जयप्रकाश नारायण आणि सरदार पटेल यांच्यातील वाद अधिकाधिक गडद होत गेला.

समाजवाद्यांना असे वाटत होते की ‘अंतरिम सरकार’ (Interim Government) स्थापन झाल्यानंतर काँग्रेस ही पूर्णतः सरकार चालवण्याकडेच (सत्ता मिळविण्यासाठीच धडपडत राहील) केंद्रीभूत होत जाईल. त्यामुळे आजवर सामायिकपणे एकत्रित होऊन लढण्याचे काँग्रेसचे चरित्र खिळखिळे होत जाईल आणि केवळ ‘तीव्र सत्ता संघर्षाचे’ चित्र काँग्रेसअंतर्गत उभे होत जाईल. अशा परिस्थितीत जयप्रकाश नारायण म्हणतात की,
“The Party shall endeavour to push the Congress towards socialism and to prevent its capture by the vested interests. If this endeavour succeeds, the Congress will rise to greater heights of influence, effectiveness and service. If it fails, the Congress must split.”

(Jayaprakash Narayan, ‘The Party and the Congress’, Janata, New Delhi, 30 March 1947, N.M.L., New Delhi.)

खरे तर, काँग्रेसची वाटचाल ही ‘नॅशनल काँग्रेस’ कडून ‘सोशालिस्ट काँग्रेसकडे’ व्हावी असे समाजवाद्यांना वाटे पण तसे घडत नव्हते. आणि यातूनच पुढे काँग्रेसला घरघर लागणे सुरू झाले होते. आणि समाजवाद्यांचा गट काँग्रेसमधून बाहेर पडला.

“काँग्रेस हे जळते घर आहे” या बाबासाहेबांच्या अलंकारिक विधानाचे आकलन होण्यासाठी ही तत्कालीन काँग्रेसची राजकीय पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे.

बाबासाहेबांनी केलेले काँग्रेसबाबतचे सदर अलंकारिक विधान हे प्रथमतः, संयुक्त प्रांत शेड्युल कास्ट फेडरेशन चे पाचवे अधिवेशन लखनऊ येथे 24 व 25 एप्रिल 1948 रोजी आयोजित करण्यात आले होते, त्या अधिवेशनात रविवार दिनांक 25 एप्रिल 1948 रोजीच्या भाषणात आढळते. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की,

“काँग्रेसमध्ये सामील होण्याने आपले काही हित साधेल असे मला मुळीच वाटत नाही. दिवसेंदिवस काँग्रेस दुर्बल होत असून समाजवादी (Socialist) बाहेर पडल्यामुळे ती अधिकच दुर्बल झाली आहे. अशावेळी या दोन्ही पक्षातील चुरशीचा लाभ घेऊन आपल्या पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाने जो पक्ष आपल्या अटी मान्य करील त्याच्याशी सहकार्य करून आपल्याला सत्ता हस्तगत करता येईल. सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.

काँग्रेसमध्ये जाऊन मागासलेल्या जातींना सत्ता हस्तगत करणे अशक्य आहे. ती एक मोठी संस्था आहे. आपण त्यात प्रवेश करणे म्हणजे महासागरात पाण्याचा थेंब टाकण्यासारखे होणार आहे. त्या संस्थेत सामील होण्याने आपली उन्नती होणार नाही. जर काँग्रेस निरनिराळ्या गटात विभागली तरच आपल्याला आपला उद्धार करता येईल. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याने आपल्या शत्रूचे सामर्थ्य मात्र वाढेल. काँग्रेसची स्थिती आज आग लागलेल्या घरासारखी झाली आहे. (Congress is a burning house and we cannot be prosperous by entering in it. I shall not be surprised if it is ruined in a couple of years. Socialists have come out of the Congress. That will certainly weaken the Congress.) त्यात प्रवेश करण्याने आपणच भस्मसात होऊ. येत्या दोन वर्षात काँग्रेसचा नाश झाला तर त्यात मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही.

समाजवादी आज काँग्रेस मधून बाहेर पडले आहेत त्यामुळे काँग्रेसचे बळ निश्चितपणे कमी होणार आहे. अशावेळी आपण तिसरा पक्ष या नात्याने आपली स्वतंत्र संघटना केली पाहिजे. जर काँग्रेस किंवा समाजवादी यापैकी कोणालाही हुकमी बहुमत प्राप्त झाले नाही तर ते आपल्या मतांची भीक मागण्यासाठी येतील. अशावेळी आपला पाठिंबा देण्यासाठी आपण आपल्या अटी पुढे करून सत्तेतील समतोलपणा राखू शकतो.” (संदर्भ : DBAWS खंड 18 भाग 3, पान क्रमांक 91 & English Vol.17/3/389)

यावरून हे स्पष्ट होते की समाजवाद्यांचा गट काँग्रेस मधून बाहेर पडून काँग्रेसची अवस्था ही दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली होती. जणू काही काँग्रेसरुपी घराला आग लागून हे घर आता लवकरच नष्ट होईल असे बाबासाहेबांनी काँग्रेसच्या तेव्हाच्या स्थितीचे वर्णन केले होते. तेव्हा या जळत्या घरात प्रवेश करून आपण स्वतःलाही (आपल्या पक्षास) भस्मसात करणे हे शहाणपणाचे होणार नाही असे त्यांचे तत्कालीन मत होते. उलट समाजवादी बाहेर पडल्याने काँग्रेसमध्ये होऊ घातलेल्या दुफळीपैकी एकाला (काँग्रेस किंवा समाजवादी), आपल्या तिसऱ्या पक्षाचा, तात्विक अटींवर पाठिंबा देता येऊ शकतो हे ओळखूनच केलेले बाबासाहेबांचे ते मुत्सद्दी विधान होय.

या विधानास अनुसरून केलेले बाबासाहेबांचे पुढील वक्तव्य हे दि. 25 एप्रिल 1954 रोजी पुलगाव, जिल्हा वर्धा येथे भंडारा जिल्ह्यात निवडणुकीच्या दौऱ्यावर ते आले असता जाहीर सभेत केलेले आढळते. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात,

“दोन वर्षांपूर्वी लखनौला भाषण देताना ‘काँग्रेस हे जळते घर आहे’ असे मी सांगितले होते. याचे तुम्हाला प्रत्यंतर आलेच असेल. आता या घराचे फक्त आढे जे नेहरू तेच उरले आहे, तेही थोड्याच दिवसात जळून जाईल. आपल्याजवळ आर्थिक बल नाही. फक्त राजकीय सामर्थ्य आहे. शरण जाणे माणसाला शोभत नाही. प्रसंगात माणूस शरण जातो पण पुन्हा तलवार हाती घेतो. आपली स्थिती यापुढे 1952 च्या निवडणुका प्रमाणे होणार नाही. मनुष्य किती दीर्घायुषी असला तरी त्याला उतरती कळा लागणारच. पण आपला मग उत्कर्षच होणार आहे. म्हणून संघटना मजबूत करा हेच माझे नेहमीचे निक्षून सांगणे आहे.” (संदर्भ : DBAWS खंड 18 भाग 3, पान क्रमांक 386)

बाबासाहेबांनी वरीलप्रमाणे स्वतःच आपल्या गत अलंकारिक वक्तव्याचा पुनरुच्चार करत त्यांना तेव्हा काँग्रेस संदर्भात काय सांगावयाचे होते हे स्पष्ट केले आणि भस्मसात होऊन मोडकळीस येणाऱ्या काँग्रेसरुपी घरामध्ये केवळ नेहरू तेवढे आता आढे म्हणून शिल्लक असल्याचेही ते याप्रसंगी सांगतात. आणि ते आढेही लवकरच संपुष्टात येईल असेही वर्तवितात. तेव्हा ‘काँगेस हे जळते घर आहे’ याचा अर्थ हा तत्कालीन राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून ‘काँग्रेस पक्ष हा लवकरच संपुष्टात येणार आहे’ या अर्थाने बाबासाहेब जनतेला सूचित करत होते, हा होय. आणि अशा या राजकिय परिस्थितीत आपण आपली संघटना इमाने इतबारे सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आपल्या अनुयायांना ते सदर भाषणातच निक्षून सांगतात की जेणेकरून “एखाद्या दीपमालेतील सर्व दिवे विझले, पण एकच पणती मिणमिणत राहिली तरी पण तीच साऱ्यांना मार्गदर्शन करते. त्याचप्रमाणे आमचा पक्ष लहान असूनही इतर पक्षांना मार्गदर्शन करील” असा त्यांना आपल्या पक्षाबाबत आशावाद वाटतो.

तत्कालीन परिस्थितीत आपला पक्ष हा ‘शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन’ होता ज्यास पुढे बरखास्त करून, या देशात संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला वेसण घालण्यासाठी, प्रबळ विरोधी पक्षनिर्मितीची नितांत गरज लक्षात घेऊन, बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षास जन्मास घालून दिले आणि महापरिनिर्वाणोपरांत आपल्या अनुयायांना ‘रिपब्लिकन पक्षचळवळ’ हस्तांतरित केली. तेव्हा ‘प्रबळ विरोधी पक्ष’ निर्मितीचा संकल्प घेऊन बाबासाहेबांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षबांधणी करणे हे लोकशाही हितार्थ आहे, हे समाज हितार्थ आहे, हेच देशहितार्थ आहे. तेव्हा ही बाब आपण सदोदित लक्षात ठेऊन कार्यप्रवण झाले पाहिजे. एवढंच !

लेखक – प्रशीक आनंद, नागपुर 
8626047057

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

spot_img
spot_img